हंगा

हंगे येथे पेशवाई पूर्वकालीन हंगेश्वराचे मंदिर असून मंदिराचे शिखर उंच आणि भव्य आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या मंदिरात तांदळापासून तयार होणाऱ्या पिंडीची परंपरा ही अनेक वर्षाची जूनी आहे. हंगेश्वराचे पूर्वाभिमुखी मंदिर शके १६१३ मध्ये गंधे बंधूनी बांधले. या पुरातण मंदिराचा दोनशे बाय दोनशे फुटांचा प्रशस्त आवार असून पायऱ्यांनी दिंडी दरवाजातून जाऊन मंदिरात प्रवेश करावा लागतो. मंदिर ५० बाय ७५ फूट आकाराच्या उंच दगडी चौथऱ्यावर असून मंदिराला दोन सभा मंडप आणि एक गाभारा असा दगडीबनावटीचे तीन दालने आहेत. गाभाऱ्याच्या शिखरावर नक्षीदार मुर्तीकाम केले असून जमीनापासुन अंदाजे ७५ फूटावर कळस आहे. मंदिराचे पूर्व पेशवेकालीन रेखीव वास्तू शिल्प अतिशय सुबक व मनोहर असून मंदिराचाकळस त्याची रंग संगती, कलात्मकता आकर्षक आहे. मंदिराजवळ एक चौकांनी बारव असून त्यावर शके १९९६ चा शिलालेख आहे. येथे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तयार होणाऱ्या तांदळाच्या पिंडीना सबळ वैज्ञानिक पुष्टी नसली तरीही या पिंडी भाविकांचे श्रध्दास्थान ठरल्या आहेत. श्रावणातील रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास गोसावी घराण्यातील एक पुजारी मंदिराच्या गाभाऱ्यात एकटाच जाउन दरवाजा बंद करतो. मंदिरात भाविकांकडून आलेले तांदूळ ठेवलेले असतात. गाभाऱ्यातील दगडी शिवपिंडाच्या शाळुंखेवर एक नाकडोळे असलेल्या स्वरुपातील पितळी टोपावर चोळीचा खण गोलाकार बांधून त्यात गहू भरतात नंतर या गव्हाच्या स्तंभावर दुपटीपेक्षा जास्त रुंदीच्या व कोरडया तांदळापासून तयार करण्यात आलेल्या पाच भरीव वजनदार कलशांची सुमारे पाच फुट उंचीची उतरंड तयार केली जाते. या शिवपिंडीच्या उतरंडीत प्रत्येकाच्या मध्ये लिंबू ठेवले जाते. मंदिरात स्वयंभूपिंड आहे. या महादेवावर शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बर्हिजी नाईक यांचीही अढळ श्रध्दा होती असे सांगतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे मोठी गर्दी होते तर तिसऱ्या सोमवारी यात्रा भरते.