पारनेर

पारनेर हे गाव अहमदनगर जिल्हयातील एक ऐतेहासिक शहर आहे. पारनेर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. पारनेर शहरात नगरपंचायत कार्यालय असून सर्व सरकारी कार्यालये, पशुवैद्यकीय दवाखाना व ग्रामिण रुग्णालय आहेत. पाराशर ऋषींच्या नावावरुन पारनेर या शहराला पारनेर असे नाव पडले आहे. पाराशर ऋषी हे महाभारतकार व्यासमुनी यांचे पुत्र होय. पारनेर शहरामध्ये महादेवाची बारा ज्योर्तिलिंग आहेत त्यामुळे पारनेर शहराला प्रतिकाशी म्हणूनही ओळखले जाते. पारनेरमध्ये राम मंदिर, हनुमान मंदिर, काळभैरवनाथ मंदिर अशी मंदीरेही आहेत. मराठ्यांच्या इतिहासात पेशवाई युगाला सुरुवात झाल्यानंतर पारनेर ही पेशव्यांच्या वर्चस्वाखाली गेले. याची साक्ष म्हणजे पारनेरमधील ‘सरदार दाभाडे वाडा’ होय. सरदार दाभाडे पहिल्या बाजीरावाचे सरदार होते. आज हा वाडा भग्न स्थितीमध्ये आहे. परंतु जे लाकडी कोरीव काम आहे शिल्लक आहे. त्यावरुन या वाड्याच्या उच्च प्रतीच्या बांधकाम वैशिष्ट्याची खात्री पटते. पारनेर मधील कावरे व औटी यांच्यामधील भांडण मिटवण्यासाठी सरदार दाभाडे पारनेरला आले होते. नानासाहेब पेशव्यांच्या कालखंडात पेशव्यांच्या कान्हूरचा सुभेदार नारो बाबाजी अभ्यंकर याने पारनेरमधील संगमेश्वर,त्रिंबकेश्वर , सिद्धेश्वर तसेच लक्ष्मीनारायण मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. लक्ष्मीनारायण मंदिराच्या शिलालेख आहे. नारो बाबाजी अभ्यंकर यांनीच शनिवार वाड्याच्या धर्तीवर कान्हूरपठार येथे प्रति शनिवार वाडा आजही उभा आहे. या वाड्याच्या बुरुज व तटबंदीच्या बांधकामासाठी माती, गुळ, लाकडाचा भुसा व राळ यांच्या मिश्रणाचा वापर केला असावा. पेशवे काळात नारो बाबाजी अभ्यंकर व लक्ष्मण महादेव करंदीकर हे पारनेरचे शिल्पकार होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात लक्ष्मण महादेव करंदीकर यांचा शिलालेख आहे. या शिलालेखामध्ये हे मंदिर का स्थापन केले विषयीची आहे.