कोरठण

महाराष्ट्राचा भूमिका कुळदैवत म्हणून अनादिकाळापासून श्री खंडोबा देवाचा महिमाही अगाध आहे. जेजूरी या मुख्य ठाण्यासह खंडोबाची सात प्रमुख ठाणी आहे. जेजूरी खालोखाल आता श्री क्षेत्र कोरठण खंडोबा हे अहमदनगर जिल्हयातील पारनेर तालुक्याचे पिंपळगाव रोठा येथील स्वयंभू ठाणे प्रसिध्दीला व वैभवाला आले आहे. कोरठण खंडोबा हा स्वयंभू असून कोणत्याही शिल्पकाराने घडवलेला नसल्याने हा बिन टाक्याचा देव म्हणून असत. त्यालाच पुढे कोरठण नाव झाले. समुद सपाटीपासून ९५५१ मी. उंचीवर विस्तीर्ण पठार भूप्रदेश असलेल्या भागावर हे देवस्थान अनादिकापासून विराजमान आहे. या तीर्थक्षेत्राचे अक्षांश १९०, रेखांश ७४० आहे. येथील हवामान आल्हादकारक व शुध्द हवेसाठी प्रसिध्द आहे. पुणे व अहमदनगर जिल्हयांचा विस्तीर्ण भूप्रदेश या पठारावरून विहंगमयपणे न्याहाळता येतो. महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून या तीर्थक्षेत्रापर्यत येताना भूप्रदेशाची चढण चढतच मंदिराच्या पायऱ्या पर्यत यावे लागते. महाराष्ट्रासह, मध्यप्रदेशातील इंदोर, देवास, ग्वालियर, उज्जैन, तसेच सुरत पर्यंत रहिवासी झालेल्या बहुतांश महाराष्ट्रीयन भाविकांचे हे देवस्थान कुळदैवत आहे. म्हणून भाविक भक्त या यात्रा महोत्सवात कुळधर्म कुलाचार म्हणून दर्शनासाठी या खंडोबा देवस्थानला येतात. दरवर्षी पौषशुध्द पौर्णिमा पासून या ठिकाणी मोठया उत्साहात तीन दिवस श्री क्षेत्र कोरठण खंडोबाचा वार्षिक यात्रा महोत्सव भरत असतो. या तिर्थक्षेत्राचा महिमा व माहिती अहमदनगर जिल्हयाचे पश्चिम सरहददीवर आणि पुणे जिल्हयाचे उत्तर सिमेवर पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा या गावी उंच पठारावर ही खंडोबाची स्वयंभू रूपातील मूर्ती व विलोभनीय भव्य असे मंदिर व परिसर नजरेत भरतो. मंदिराचे समोरून १ कि.मी. अंतरावरूनच या मंदिराचे अनोखे वैभव, गगनाला गवसणी घालणारा सुवर्ण कळस भाविकांचे मन मोहून घेतो. या देवस्थानाला दररोज येथून जवळच असलेले जगप्रसिध्द असे वडगाव दर्याचे लवणस्तंभ, निघोजचे आश्चर्यकारक रांजणखळगे, टाकळी ढोकेश्वरचे पांडवकालीन लेणी, मांडओहळ धरण, माळशेज घाट या ठिकाणी भेट देणारे पर्यटक व भाविक या खंडोबालाही रोज भेट आहेत. श्री कोरठण खंडोबा हे देवाचे स्वयंभू रुप आहे. दगडी तांदळारुपातच बाणाई, म्हाळसा व मध्ये खंडोबा, यांना आपण दर्शनाला पाहता क्षणीच भान हरपून जाते. या स्वयंभू तांदळयाचे पुढयातच बारा स्वयंभू लिंगे आहेत. त्यावर भंडाराचे पिवळे सोने सतत असते. पूर्वीच्या काळी या दगडी तांदळयाला मूर्तीचा आकार देणाचा प्रयत्न केला असता त्यावरुन रक्त येऊ लागले म्हणून त्या खांचामध्ये शिसे व सिमेंट भरुन बुजविण्यात आलेल्या आजही दिसतात. रोज सकाळी स्वयंभू रुपातील तांदळा व बारा लिंगांना शुध्द पाण्याचे स्नान घातले जाते. नंतर चंदन उगाळून त्यात चांदीचे डोळे तांदळयावर बसविले जातात. त्यावर पगडी ठेवतात. पगडीवर फुलांची शेज लावली की देवाचे स्वरुप निर्माण होते. चंदन गंधानेच देवाचे मुख आरेखीत केले जाते. हा नित्यक्रम रोज नव्याने केला जातो. सकाळ, दुपार व सायंकाळ त्रिफाळ आरती केली जाते. जागृत देवस्थान म्हणून भाविक येथे कौल लावतात. फुलांचे शेजेतील उजवीकडील फूल पडल्यास उजवा होकारार्थी कौल झाला असे मानतात. त्यानुसार भाविक संकल्प व योजना ठरवितात. यात्रा व उत्सव काळामध्ये व स्वयंभू तांदळयावर पितळी व चांदीच्या उत्सव मूर्ती, सोन्याचे साज शृंगार विभूषीत केले जातात. लाखो भाविक वर्षभरातून या उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी व तळीभंडार करुन कुळधर्म कुलाचार करण्यासाठी यात्रा उत्सवाला आवर्जून हजेरी लावतात. पूर्व दंत कथा व आख्यायिकेनूसार शंकराने मार्तड भैरवाचा अवतार घेऊन मनी व मल्ल यांचा वध करुन अवतार कार्य संपल्यावर निजधामाला जाण्यासाठी काटेरी व साबराची झाडेझुडुपे असलेल्या या ठिकाणी समाधी असवस्थेत अनुष्ठाण लावले होते. समाधी अनुष्ठान अवस्थेतच त्यावर वारुळ तयार झाले. त्याचा तांदळा स्वयंभूरुपात प्रगटला म्हणून या स्थानाला कोरंठाणं म्हणूनही कोरठणचा खंडोबा म्हणू लागले. सन १४९१ मध्ये पुरातन मंदिराचे बांधकाम केल्याचा शिलालेख येथे आहे. सन १९९४ सालापर्यत हे देवस्थान एक दुर्लक्षित व उपेक्षित मंदिर म्हणून अधोगतीत चालले होते. मंदिर आवारातच वास्तव्य करणारे पुजारी, जनावरे गोठे यांचेच साम्राज्य माजले होते. मंदिर वास्तू व परिसरातील दिपस्तंभ, पायऱ्या, महोदव मंदिर यांची पडझड झालेली होती. त्यावेळी यात्रेतील अनादिकाळापासून चाललेली बकरेबळी प्रथा आणि त्या अनुषंगाने दारूचा प्रादुर्भाव व अव्यवस्था अशी पूर्वीची जत्रा होत असे. परंतु सन १९८८ - ८९ सालापासून मुबंई विठठल गायकवाड या तरुणाने संपूर्ण त्यागी जीवन जगण्याचा संकल्प प.पू. गगनगिरी महाराज यांचे आशिर्वादाने केला आणि पिंपळगांव रोठा या आपल्या जन्मगावी येऊन गावविकासाच्या व मंदिर जिर्णोध्दाराच्या कार्यास सुरुवात केली. मंदिराजवळ सन १९८८ साली यात्रेतील बकरेबळी प्रथा संपूर्णपणे बंद करण्यात ग्रामस्थांचे मदतीने भाविकांचे मतःपरिवर्तने घडविले. जंत्रेत कत्तलखान्याचे जागेवर भजन मंडप लावून बकरे बळीच्या दिवशी अनोखा उपक्रम मंबुई येथील गगनगिरी महाराज भक्त व भजन मंडळाकडून राबवीला. त्याला यश मिळविले. गेली १८ वर्षे ही बळीची प्रथा पूर्णपणे बंद होऊन परिसरातील कासारे, पुणेवाडी या देवस्थानांनीही हा आदर्श घेऊन बकरे बळीची प्रथा बंद केली आहे. कोरठण यात्रेची वैशिष्टये - १) गगनाला गवसणी घालणाऱ्या उत्तुंग काठयांची मिरवणूक. २) दर्शनासाठी ४ लाखावर भाविक ग्रामीण व शहरी संस्कृतीचा मिलाप. ३) भाविकांनी फुललेले डोंगर ४) अनेक पालख्यांची मिरवणूक ५) बैलगाडयांचे देवर्शन ६) सर्व प्रकारची सामानाची व विविध प्रकारचे खादयपदार्थ दूकाने व त्यातून होणारी लाखो रुपयांची उलाढाल. कोरठणं खंडोबाला ( पिंपळगाव रोठा ) येण्याचे मार्ग - १। नगर - पुणे रोडने सुपा - पारनेर - कान्हूर - पिंपळगाव रोठा - कोरठण २। पुणे - शिरुर - राळेगणसिध्दी - पारनेर - कान्हूर - कोरठण ३। नगर - कल्याण रोडने टाकळी ढोकेश्वर - कान्हूर - कोरठण ४। आळेफाटा - बेल्हा - अणे - नांदूर - कोरठण